• Wed. Feb 5th, 2025

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या बैठकीत बँक मित्रांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा

ByMirror

Feb 5, 2025

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकवटण्याचे आवाहन

संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्‍न सुटणार नाही -कॉ. देविदास तुळजापूरकर

नगर (प्रतिनिधी)- संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्रांचे प्रश्‍न सुटणार नाही. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकवटावे लागणार आहे. बँक प्रशासन संघटनेचे शत्रू नसून, त्यांच्या अन्यायकारक धोरण विरोधात संघर्ष आहे. एकासाठी सगळे, सगळ्यांसाठी एक! हे संघटनेचे धोरण आहे. बँक मित्रांच्या प्रश्‍नांची सोडवणुक न केल्यास जनता व बँके मधील दुवा संपुष्टात येऊन ही व्यवस्था कोलमडणार असल्याचा धोका महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनचे अध्यक्ष कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केला.


अहिल्यानगर शहरात बँक मित्रांच्या प्रश्‍नावर महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना कॉ. तुळजापूरकर बोलत होते. याप्रसंगी जनरल सेक्रेटरी कॉ. शिरीष राणे, खजिनदार कॉ. संजीव डोंगरे, सहाय्यक जनरल सेक्रेटरी (बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे) कॉ. संजय दळवी, ऑर्ग. सेक्रेटरी कॉ. प्रकाश कोटा, जनरल सेक्रेटरी (महाराष्ट्र ग्रामीण बँक) कॉ. सुजय नळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे कॉ. तुळजापूरकर म्हणाले की, सरकारच्या जनधन, अटल पेन्शन, जीवन सुरक्षा, जीवन ज्योती या योजना चांगल्या प्रकारे सफल होण्यात व अमलात आणण्यास बँक मित्रांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. परंतु बँक मित्रांचे काही प्रश्‍न असल्यास बँक व्यवस्थापन तसेच सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने संघर्ष करुन आपले हक्क मिळविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर संघटनेच्या वतीने सर्व जिल्हा प्रतिनिधींची बैठक पुणे येथे होणार असून, त्यामध्ये बँक मित्रांच्या प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करुन पुढील दिशा निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.


या सभेला जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत साबळे, भूषण थोरात, नितीन चिखले, नगर कार्यकारणी सदस्य दत्तात्रय शिंदे, दीपाश्री चोळके, मच्छिंद्र तांबे, विजय सांगळे, अनुराधा खडके, अभिजीत लेलकर, गोकुळ दाकांडेकर, विजय कोष्टी, नारायण वाघ, केशव बुलाखे, अशोक रणसिंग, सुमित शेलार, नवनाथ शेलार, दिलीप जगताप, आशिष गोरे, अमोल खुडे, शिवम वाघ आदींसह मोठ्या संख्येने विविध बँकांचे बँक मित्र उपस्थित होते. विविध शाखांच्या बँक मित्रांनी या बैठकीत आपले अडचणी व प्रश्‍न मांडले. सध्या बँक मित्रांचे कमिशन हे कमी करण्यात आले आहे. त्यांना कुठल्याही सुट्ट्या नाहीत, सेवेमध्ये कुठल्याही मेडिकल सुविधा व सुरक्षितता नाही, वेळेचे बंधन नसल्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.


गरीब जनतेसाठी बँक मित्र जीवन वाहिनी बनले आहे. सर्व बँक मित्र सुरुवातीला प्रत्यक्ष बँकेशी करार करून त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते, पण आता बँक कॉर्पोरेट एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर त्यांची नेमणूक करत आहेत. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये खूप कपात करण्यात आली आहे. हे तुटपुंज कमिशन ही वेळेवर देण्यात येत नाही. त्याचा दर मनमानी पद्धतीने निश्‍चित केला जातो. अनेक जास्तीचे कामे विना मोबदला करून घेतली जातात. बँका नियुक्तीपत्र, शर्ती अटीबाबतचे पत्र बँक मित्रांना देत नाही. यामुळे बँक मित्रांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना संघटित करुन पाठपुरावा सुरु करण्यात आलेला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *