दिव्यांग व्यक्तीस पुन्हा सेवेत घेण्याची मागणी; जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
दिव्यांगावर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रहार अपंग क्रांती संघटना तीव्र आंदोलन छेडणार -ॲड. लक्ष्मण पोकळे
नगर (प्रतिनिधी)- वडझिरे (ता. पारनेर) ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या दिव्यांग संगणक केंद्र चालक राजेश शिवाजी शेंडकर यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अचानकपणे बेकायदेशीररीत्या निलंबित करण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शेंडकर यांना तात्काळ सेवेमध्ये पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
राजेश शेंडकर हे 2018 पासून वडझिरे ग्रामपंचायतीमध्ये संगणक केंद्र चालक म्हणून प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. शेंडकर व त्यांची पत्नी दोघेही दिव्यांग असून त्यांच्यावर आजवर कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायतीने पदाचा गैरवापर करून बिनबुडाच्या आरोपांच्या आधारे त्यांचे निलंबन केले आहे. विशेष म्हणजे, या निलंबनापूर्वी त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, तसेच कोणतीही कायदेशीर सुनावणी देखील झालेली नाही.
शेंडकर कुटुंब पूर्णपणे या नोकरीवर अवलंबून आहे. त्यांच्या निलंबनामुळे दोघा दिव्यांग पती-पत्नीसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. आजवर कोणताही दोष नसताना केवळ वैयक्तिक द्वेषातून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप स्थानिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
राजेश शेंडकर यांना तत्काळ सेवेत समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. पोकळे यांनी दिला आहे.