स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष
नगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज व विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन आपल्या पालकांसह दिंडीत सहभागी झाल्या होत्या. ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने परिसर निनादला. भुतकरवाडी परिसरातून या दिंडीचे मार्गक्रमण झाले. या चिमुकल्यांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. महादेव मंदिराच्या परिसरात दिंडीची सांगता झाली. शालेय संचालिका स्वाती डोमकावळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची दिंडी रंगली होती.
जिल्हा उद्योग कार्यालय व समृद्धी महिला बहुउद्देशीय सोसायटी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण योजनेअंतर्गत दिंडीतील बालकांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या पालकांना मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. गणेश मिसाळ म्हणाले की, लहान मुले म्हणजे विकसित होणारे शरीर आणि तेजस्वी होत जाणारे मन, त्यांना वाढीसाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अधिक पोषणाची गरज असते. जर बालपणात त्यांना योग्य आणि संतुलित आहार दिला गेला, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौद्धिक विकास चांगला होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सविता सब्बन, धनश्री काळे, सायली गायकवाड, प्रांजली जोशी आदींसह पालकांनी परिश्रम घेतले.