भाजपच्या त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, चोंडी (ता. जामखेड येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व महसुल मंत्री यांच्या अंगावर भंडारा टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, योगेश साठे, जीवन पारधे, वर्षाताई बाचकर, अमर निर्भवणे, डॉ. जालिंदर घिगे, ह.भ.प. पाहुणे महाराज, मंदाकिनी बडेकर, राजू खंडागळे, अनिल जाधव, साईनाथ बर्डे, प्रवीण ओरे, संतोष चाळके, जनार्दन बाराते, मचींद्रर कोपनर, स्वप्निल पाटील आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व धनगर समाज बांधव उपस्थित होते.

मंत्री विखे यांच्या अंगावर भंडारा टाकणाऱ्या व्यक्तीला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. आजपर्यंत सर्व सरकारने धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला आहे. धनगर समाज हा भटक्यांमध्ये मोडला जातो आणि शिक्षणाचे प्रमाण देखील कमी आहे. समाजाला प्रभावी नेतृत्व नसल्याने धनगर समाजा मागे राहिला आहे. म्हणून मेंढपाळांवर वारंवार अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहे. आज पर्यंत आरक्षणासाठी धनगर समाजाला चालढकल करण्यात आली. मात्र धनगर समाजाला आरक्षणाची खरी गरज असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात म्हंटले आहे.
चोंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले आहे. यामधील उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून, त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व भंडारा टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
