लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक
नगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडाऱ्याची उधळण व लक्ष्मीमातेचा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून यात्रेच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीत प्रकाश वाघमारे, पप्पू पाटील, सागर साठे, दीपक साबळे, दीपक सरोदे, संकेत लोखंडे, अश्विन खुडे, सतिश साळवे, सुरेश वैरागर, किशोर उल्हारे, दीपक लोखंडे, बंटी साबळे, पप्पू पाथरे, गणेश ससाणे, अजय केजारला, मयूर चखाले, राजू कांबळे आदींसह युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरवर्षी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, 50 ते 60 वर्षची या यात्रेला परंपरा आहे. युवकांनी प्रवरा संगम येथून कावडीने आणलेल्या जलने रामवाडी येथील लक्ष्मी मातेच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात आला. विधीवत पूजा करुन लक्ष्मीमातेच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. भाविकांसह युवकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला. ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूरा, रंगभवन येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे तिचा समारोप झाला.
तसेच यात्रेच्या आदल्यादिवशी रामवाडीत यात्रेनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, इंगळे प्रतिष्ठानचे विकी इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये भंडारा वाटपाचे प्रारंभ करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला.