मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण
28 व 29 मे रोजी रंगणार कुस्तीचा थरार
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात होणार लढत
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. 28 व 29 मे रोजी शेवगाव येथील खंडोबा नगर मैदानावर ही दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
या स्पर्धेची अधिकृत घोषणा व पोस्टरचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे आणि भाजपचे प्रदेश चिटणीस व स्पर्धेचे आयोजक अरुणभाऊ मुंढे, यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध मल्लांची निमंत्रित थरारक कुस्ती राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात दोन लाख रुपयांच्या बक्षीसावर रंगणारी कुस्ती ही प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात दीड लाख रुपयांची कुस्ती होणार असून, महिला विभागातही जबरदस्त झुंज पाहायला मिळणार आहे. नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात एक लाख रुपयांवर निमंत्रित कुस्ती होणार आहे.
या सर्व निमंत्रित व अंतिम कुस्त्या निकाली ठेवण्यात आलेल्या असून प्रेक्षकांना कुस्तीचा उत्साह आणि थरार अनुभवता येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध वजनगटांतील कुस्त्यांमध्ये विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांना 5 हजार ते 51 हजार रुपये पर्यंतचे बक्षीस देण्यात येणार असून उपविजेते व तृतीय क्रमांकाच्या मल्लांनाही आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व विजेत्या मल्लांना विशेष चषकांचे वितरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक अरुणभाऊ मुंढे यांनी दिली.
शेवगाव येथे होणारी यंदाची देवा भाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा ही संपूर्ण जिल्ह्यातील आणि राज्यातील कुस्ती प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या भव्य आयोजनामुळे शेवगावमध्ये कुस्तीचा उत्सव रंगणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.