पोलिसांच्या कार्याचे कौतुक
शांतता, सुव्यवस्थेसाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची -ॲड. अनुराधा येवले
नगर (प्रतिनिधी)- शहर आणि ग्रामीण भागात एकाच वेळी आलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे धार्मिक सण शांतता, सुव्यवस्था आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची ठरली. याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात शहराचे विभागीय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. अनुराधा येवले, ॲड. अमोल अकोलकर, ॲड. रामदास घावटे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, महिला पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. अनुराधा येवले म्हणाल्या की, मोहरम व आषाढी एकादशी हे दोन महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. परंतु पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कामगिरी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता दोन्ही सण अत्यंत शांततेत पार पडले, ही खरोखरच कौतुकास्पद आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.