• Sat. Feb 7th, 2026

उपमहापौर धनंजय जाधव यांचा संत सावता माळी क्रांती परिषदेतर्फे सत्कार

ByMirror

Feb 7, 2026

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध उपमहापौर धनंजय जाधव


युवक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात सामाजिक, राजकीय व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास संत सावता माळी क्रांती परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, श्रीराम प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ सोनवणे, माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश गाडीलकर, संदीप लाळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


सत्काराला उत्तर देताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, जनतेने मतदानाच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी भरीव काम केले जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


युवकांसाठी उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आवश्‍यक ते प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा व विरंगुळ्यासाठी उद्यानांची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी संत सावता माळी क्रांती परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, युवा व अभ्यासू नेतृत्व म्हणून धनंजय जाधव यांना भाजपच्या माध्यमातून मिळालेली संधी ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी निश्‍चितच महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणाचे संस्कार त्यांना वडील स्व. कृष्णाभाऊ जाधव यांच्याकडून मिळाले असून, त्यांनी नगरसेवक म्हणून शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले होते.


त्याच सामाजिक व विकासात्मक वारशाला पुढे नेत धनंजय जाधव हे शहराच्या विकासात्मक कामांना आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देतील, असा विश्‍वासही गणेश बनकर यांनी व्यक्त केला. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आणि धनंजय जाधव यांना उपमहापौर पदाची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचे सामाजिक संघटनांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *