• Thu. Oct 16th, 2025

शहरात रंगणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला

ByMirror

Jan 16, 2025

शहर शिवसेनेने स्विकारले आयोजनपद

रिपब्लिक कपसाठी भिडणार 15 राज्यांतील 830 खेळाडू

नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे आयोजन येत्या 18 आणि 19 जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे होणार आहे. युथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 15 राज्यांतील 830 खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करताना देशभरातील प्रेक्षकांसमोर कराटेचा थरार निर्माण करणार आहेत. या स्पर्धेचे आयोजनपद शहर शिवसेनेने स्विकारले असल्याची माहिती गुरुवारी (दि.16 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली. यावेळी युवा सेना प्रमुख पै. महेश लोंढे, साहिल सय्यद, सबिल सय्यद आदी उपस्थित होते.


राजकारण व समाजकारण करत असताना खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पक्षात देखील विविध पदावर कार्यरत असलेले खेळाडू आहेत. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.


जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने कराटेचे खेळाडू येणार असून, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उत्तम प्रकारे राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्व नगरकरांसाठी प्रेक्षणीय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि कराटे खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळवून देणे आहे. विजेत्यांसाठी मोठी रोख बक्षिसे आणि आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आली असल्याची माहिती साहिल सय्यद व सबिल सय्यद यांनी दिली.


स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ओके या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले जाणार असून, प्रेक्षकांना घरी बसून या रोमांचक स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. या स्पर्धेत 8, 10, 12, 14, 18 वर्षांखालील व 18 वर्षांवरील वगोगटात विविध वजनगटात स्पर्धा होणार आहे.
प्रत्येक वयोगटातील विजेत्यास 5 हजार रोख व सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाला 51 हजार रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे. मागील वर्षी झालेल्या पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले होते, तर कर्नाटक आणि गुजरात यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले होते. यंदाच्या स्पर्धेत कोणता संघ विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि आमोल खताळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. शिवसेना व अहिल्यानगर रुरल ॲण्ड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या दरम्यान शिवसेनेचे मंत्री व राज्यातील पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित केले जाणार आहे. या उपक्रमाने नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि कराटे खेळाला नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *