सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघाने पटकाविले विजेतेपद
कर्नाटक द्वितीय तर राजस्थान राहिले तृतीय स्थानी
नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा शहरात उत्साहात पार पडली. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघाने विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर राजस्थानने तिसरे स्थान मिळवले.
शिवसेना, युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रुरल ॲण्ड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री उशीरा या स्पर्धेचा समारोप दिमाखात पार पडला. विजेत्या खेळाडूंसह संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या संघाला 51 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. तर प्रत्येक गटातील विजेत्यांना 5 हजार रोखचे बक्षीस देण्यात आले.
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, कराटे असोसिएशनचे सबील सय्यद आणि साहिल सय्यद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला, विजेत्या संघाला 51 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना 5 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली.
8, 10, 12, 14, 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील विविध वजनगटांतील लढतीने प्रेक्षकांची मने जिंकली. अटीतटीच्या लढतीमध्ये कराटेच्या थरारने उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला. कराटे खेळाला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल खेळाडूंनी आभार मानले.