सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांची प्रशासकाकडे मागणी
इमारतीमधील गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तीचा ताबा; मोबाईल टॉवरचे भाडे वसुल करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील लोढा हाइट्स मधील गाळ्यांचा लिलाव करुन ती रक्कम ठेवीदारांचा ठेवी परत देण्यासाठी वापरावी व या इमारतीमधील गाळ्यांवर ताबा मारुन आणि मोबाईल टॉवरचे भाडे वसुल करणाऱ्या राजकीय व्यक्तीवर फौजदारी कारवाई करुन ते पैसे बँकेला मिळण्याची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी केली आहे.
भिंगारदिवे यांनी सोमवारी (दि.29 जुलै) अर्बन बँकेचे प्रशासक गणेश गायकवाड यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रशासक गायकवाड यांनी लोढा हाइट्स मधील भाडे वसूल करणाऱ्याकडून व्याजासह रक्कम वसूल केली जाणार असून, यासंबंधी त्या राजकीय व्यक्तीला नोटीस बजावण्याचे आश्वासन दिले.
शहरातील नवी पेठ कॉर्नर येथे असलेली लोढा हाइट्स इमारत अर्बन बँकेच्या ताब्यात आहे. तेथील काही गाळ्यांवर शहरातील एका राजकीय व्यक्तीकडे ताबा आहे. सदर गाळ्यांचा ताबा अर्बन बँकेने घेणे आवश्यक आहे. तातडीने त्या गाळ्यांचा लिलाव करावा व त्यापोटी प्राप्त होणारी रक्कम ठेवीदारांना देण्यात यावी. या इमारतीवर जे मोबाईल टॉवर आहे, त्याचे भाडे देखील तो राजकीय व्यक्ती परस्पर घेत आहे.
त्याने घेतलेले सर्व भाडे त्याच्याकडून वसूल करावे. मोबाईल कंपनीशी पत्रव्यवहार करून त्याचा करारनामा करुन पुढचे भाडे थेट बँकेला मिळेल अशी व्यवस्था करावी. तर या इमारतीत असलेले पहिल्या मजल्यावरील वाहनतळ स्थानिक गाळेधारक व येणाऱ्या नागरिकांसाठी खुले करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणी तातडीने कार्यवाही न झाल्यास बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा भिंगारदिवे यांनी दिला आहे.