• Fri. Mar 14th, 2025

मढीच्या यात्रेतील तो ठराव घेणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पदच्युत करून फौजदारी गुन्हे दाखल करा

ByMirror

Feb 27, 2025

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव संविधान विरोधी व बेकायदेशीर;

आमदारांसारखे लोकप्रतिनिधी अशा असंवैधानिक कृत्याला पाठिंबा देतात, हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद

नगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा घेतलेला ठराव संविधान विरोधी व बेकायदेशीर आहे. अधिकाराचा गैरवापर व असंवैधानिक कृत्य केल्याप्रकरणी दोषी सरपंच आणि ग्रामसेवकाला पदच्युत करून फौजदारी गुन्हे दाखल करुन ग्रामपंचायत मंडळ बरखास्त करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात कठोर भूमिका न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते, सहसचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संजय नांगरे, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. भगवानराव गायकवाड, कॉ. फिरोज शेख आदींनी दिला आहे.


मढी ग्रामपंचायतच्या ठरावाने मुस्लिम समाजाबद्दल अविश्‍वास व द्वेष पसरविण्याचे काम करण्यात आले आहे. राजकारणासाठी मुस्लिम धर्मियांबद्दल जाणीवपूर्वक हा ठराव घेण्यात आलेला आहे. कुठल्याही भेदावर राज्यघटना भेदभाव करण्यास परवानगी देत नाही. मढीच्या ग्रामसभेत केलेला ठराव राज्यघटनेच्या विरोधात स्वातंत्र्य, समता व बंधुतेला हरताल फासण्यात आला आहे. मढी यात्रा केवळ राज्यातच नव्हे तर देशात बंधुत्व व सामाजिक सलोखा, शांततामय सहअस्तित्वासाठी प्रसिद्ध आहे.यात्रेतील पिढ्यानपिढ्या चालत आलेली शांततामय बंधुत्व व सलोख्याची परंपरा या ठरावाने जाणीवपूर्वक दूषित करण्यात आली आहे. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन हे कृत्य करण्यात आले असून, अशा शक्ती महाराष्ट्रभर सक्रिय असून विशिष्ट समाजाला टार्गेट करून समाजात धार्मिक द्वेष पसरण्याचे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध व धिक्कार करण्यात आला असून, फक्त निषेध करून चालणार नसून प्रशासनाने संविधान विरोधात कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


जे काही लोकप्रतिनिधी या असंवैधानिक ठरावाला पाठिंबा देत आहे, त्यांना देखील राज्य घटनेच्या संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमदारांसारखे लोकप्रतिनिधी अशा असंवैधानिक कृत्याला पाठिंबा देतात, हे छत्रपती शिवराय आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. ग्रामसभेच्या असैविधानिक ठरावाला पाठिंबा देणाऱ्यांवरही कारवाई करावी. ग्रामसभेत काहींची दिशाभूल करून अगोदरच सह्या घेऊन ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची देखील चौकशी करण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *