अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची जिल्हाधिकारींकडे तक्रार
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची सर्व बिले थांबविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरेगाव, काळकुप, माळकुप येथे सुरू असलेले जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर काम शासन परिपत्रकानुसार काम केले जात नसल्याची तक्रार केली असून, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची सर्व बिले थांबविण्याची मागणी केली आहे.
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरेगाव, काळकुप, माळकुप येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, ठेकेदार मनमानी पध्दतीने करत आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यापूर्वी ठेकेदाराने वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर कुठल्याही विभागाची परवानगी घेतलेली नसून, परिसरातील अनेक झाडे तोडण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे कामे करण्यात आली. त्याच रस्त्याच्या बाजूने खोदून पाणीपुरवठ्याचे काम सुरु आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन सदर काम होत असून, काम व्यवस्थित न झाल्यास पुन्हा ग्रामस्थांचा पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. तर शासन पुन्हा पाणीपुरवठ्यासाठी निधी देणार नाही. सदर कामामुळे ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार असल्याने काम दर्जेदार होण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
ठेकेदाराला योजनेसंबंधी प्लॅन इस्टिमेटची मागणी केल्यास तो ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. सदर काम शासन परिपत्रकानुसार होत नसल्याने होणारे काम वाया जाण्याची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरेगाव, काळकुप, माळकुप येथे सुरू असलेले जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत थांबवून संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्नी 21 दिवसात कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांसह नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
