• Thu. Oct 16th, 2025

अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी

ByMirror

Feb 18, 2025

प्रत्येकी दोन गुंठे जागेत रमाई आवास योजना राबवा

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचे अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांचे अतिक्रमण नियमाकुल करुन त्यांना प्रत्येकी दोन गुंठे जागा राहण्यासाठी देण्याची मागणी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांना बेघर केल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर झोपड्या बांधून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेव चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समितीचे सदस्य अशोक भोसले, भरत डोंगरे, मंदा जगधने, सोनाली कांबळे, दिपाली भोंडगे, रंजना डोंगरे, कांताबाई नेटके, पिनू भोसले, संजय शिंदे, ओंकार भोसले, बिरगी काळे आदी उपस्थित होते.
वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर 595/1 मधील शासकीय मोकळ्या जागेवर गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील नागरिक राहत आहे. काही कुटुंबीय पक्के घर करून, तर काही झोपड्यात राहत आहे. त्यांना वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीने नळ कलेक्शन दिले असून, ते पाणीपट्टी देखील ते भरत आहे. त्याचप्रमाणे विद्युत महावितरण मार्फत त्यांना लाईट मीटर घेण्यात आले असून, त्याचे बिल देखील ते अदा करत आहेत. अनेक वर्षापासून वास्तव्य असल्याने त्यांचे मतदार यादीतही नाव समाविष्ट असून, नुकतेच त्यांना नोटीसद्वारे जागा खाली करण्याचे सांगण्यात आले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली हा उपेक्षित वर्ग बेघर होण्याचा धोका झाला असल्याचे म्हंटले आहे.


सदर कुटुंबीयांना दिलेले नोटीस रद्द करून त्यांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबास दोन गुंठे जागा देऊन रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *