अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने कारवाई करा, अन्यथा उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोड, कोल्हेवाडी फाटा (ता. नगर) येथील अवैध दारुच्या दुकानात दारु पिऊन एकाचा मृत्यू झाला असल्याने तात्काळ अवैध दारु व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
कोल्हेवाडी फाटा येथे सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीच्या व्यवसायामुळे 1 जून रोजी दारू पिऊन एकनाथ वाघमारे यांचा मृत्यू झाला. नगर तालुका पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने अनेक दिवसापासून सदरचे अवैध दारु व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दहा बाय दहाच्या गाळ्यामध्ये देशी, विदेशी, हातभट्टी मोठ्या प्रमाणात विक्री सुरु असते. अनेक कामगार तेथे दारु पिण्यास येतात. एकनाथ वाघमारे (रा. खोपोली, जिल्हा रायगड) कामानिमित्त कोल्हेवाडी भागात असल्याने दारू पिण्यास सदरच्या दारु दुकानात गेले होते. दारू पिऊन घरी गेल्यावर उलट्यांचा त्रास होऊ लागला, परिस्थिती बिघडल्याने व आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शहरातील जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनच्या अहवालानुसार या मृत्यूस जबाबदार असणारे अवैध दारु व्यावसायिकावर गुन्हा दाखल करुन, सदरचा अवैध दारु व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.