• Thu. Jul 31st, 2025

कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी शहरात ड्राय पोर्ट कन्सेप्ट राबविण्याची मागणी

ByMirror

Jul 29, 2025

राष्ट्रवादी युवकचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन


ड्राय पोर्ट कन्सेप्ट राबविल्यास शेती मालासाठी चांगले दिवस येतील -इंजि. केतन क्षीरसागर

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात कृषी उत्पादनांचा व्यापार वाढीसह, एमआयडीसीच्या विकास आणि युवकांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने ड्राय पोर्ट कन्सेप्ट राबविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.


राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना. पवार शहरात आले असता त्यांची भेट घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात निवेदन दिले. यावेळी युवक प्रवक्ता किरण घुले, दीपक वाघ, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, केतन गोरे, रोहित सरना, मंगेश शिंदे, सुदर्शन गोरे, हृषीकेश जगताप, गौरव हरबा, राजू मकासरे, कुणाल ससाणे, सचिन डेरे, स्वप्नील कांबळे, ओंकार मिसाळ, बोगवत, आशुतोष पानमळकर, अरबाज शेख, कृष्णा शेळके, अमित बडे, प्रवीण खंडागळे, पंकज शेंडगे आदी उपस्थित होते.


अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा व कृषी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. जिल्ह्यात तीन एमआयडीसी असल्याने विविध कृषी पिकांचे उत्पादने निर्यात करण्यासाठी मोठा वाव आहे. परंतु दळणवळणाला पुरेश्‍या सुविधा नसून, मालाच्या दळणवळणासाठी मोठा खर्च येतो. वाहतुकीला वेळ जास्त लागत असल्याकारणाने नाशवंत माल निर्यात करण्यास अडचणी येतात. त्यामुळे कृषी व औद्योगिक क्षेत्राच्या वाढीस चालना मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या समस्येवर उपाय म्हणून अहिल्यानगर शहरासाठी ड्राय पोर्ट ही संकल्पना राबविल्यास शेती मालाची योग्य प्रकारे साठवणुक करुन त्याचे इतर राज्यात व परदेशात विक्रीसाठी घेऊन जाता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी व औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होऊ शकतो आणि अनेक युवक-युवतींना रोजगार मिळू शकणार असल्याचे म्हंटले आहे.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादन घेत आहे. दर्जेदार पिक असून, देखील त्याला भाव मिळत नाही. ते इतर राज्यात व देशात पाठविण्यासाठी त्याची साठवणुक व दळणवळणासाठी मर्यादा येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून ड्राय पोर्ट कन्सेप्ट राबविण्यात आल्यास शेती मालासाठी चांगले दिवस येतील. तर अनेक युवक शेती व्यवसायाकडे वळतील. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *