• Thu. Apr 2nd, 2026

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आशाताई गवळी यांच्या नियुक्तीची मागणी

ByMirror

Apr 2, 2026

अखिल भारतीय सेनेचे निवेदन; सक्षम नेतृत्वाची गरज


महिलांच्या न्याय व सक्षमीकरणासाठी अनुभवी नेतृत्वाची अपेक्षा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सौ. आशाताई अरुणभाऊ गवळी यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दळवी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन पाठविले आहे. यावेळी रावसाहेब काळे पाटील उपस्थित होते.


अलिकडील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला असून, सध्या हे महत्त्वाचे पद रिक्त आहे. या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या संरक्षण, न्याय आणि सक्षमीकरणासाठी सक्षम, निष्ठावान व अनुभवी नेतृत्वाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सौ. आशाताई गवळी या अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असून, त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार व शोषणाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली असून अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे. याशिवाय, गरजू व होतकरू मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना सक्षम बनविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.


महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबविणे, समाजातील दुर्बल घटकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, तसेच स्थानिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी संघटनात्मक बळ उभे करण्याचे कार्य गवळी यांनी सातत्याने केले आहे.


आजच्या परिस्थितीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आणि पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे या पदावर कर्तृत्ववान, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती होणे अत्यावश्‍यक असल्याचे अखिल भारतीय सेनेने स्पष्ट केले आहे.


सक्षम नेतृत्वाची नियुक्ती न झाल्यास समाजात चुकीच्या प्रवृत्तींना चालना मिळून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी सौ. आशाताई अरुणभाऊ गवळी यांच्या कार्याचा विचार करून त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *