भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
स्वच्छतेचा उडाला बोजवारा व अंधारामुळे रात्री लहान-मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर प्रश्नाबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अस्वच्छता व रस्त्यावर रात्री असलेल्या अंधाराबाबत लक्ष वेधले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, मंगेश खताळ, युवकचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, विशाल बेलपवार, संपत बेरड, सुदाम गांधले, दीपक लिपाणे, मतीन ठाकरे, सिद्धार्थ आढाव, मारुती पवार, प्रशांत डावरे, अनिल तेजी, ज्ञानेश्वर फासे, संजय खताडे, रत्नदीप गारुडकर, दिनेश लंगोटे, अरुण वाघ, सागर चवंडके, संकेत झोडगे, प्रमोद जाधव, अक्षय पथारिया, प्रकाश वाव्हळ आदी उपस्थित होते.
नगर शहरातून भिंगारमध्ये प्रवेश करताना नाला परिसरात व भिंगार परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, धार्मिक स्थळा समोर देखील मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा साचून राहत असून, त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. नागरिकांना साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच भिंगार अर्बन बँके ते स्टेट बँक चौक दरम्यान रस्त्यावर असलेले अनेक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. पथदिव्यांवर झाडाच्या फांद्या लोंबकळत असून, काही ठिकाणी धोकादायक पध्दतीने विजेच्या तारा खाली आल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.