रिपब्लिकन युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन
साईड पट्टयांच्या अपूर्ण कामामुळे निर्माण झालाय धोका; ब्लॉकच्या ऐवजी लावले मातीचे ढिगार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे अरणगाव (ता. नगर) येथील बाह्यवळण रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नाट मळा दरम्यान असलेल्या उड्डाणपुलावरील साईड पट्टयांचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर डी.एस. झोडगे यांना या प्रश्नासंदर्भात निवेदन दिले असून, तातडीने काम सुरु न झाल्यास कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मौजे अरणगाव (ता. नगर) येथील बाह्यवळण रस्त्यावर उड्डाणपुल उभारणीचे काम जी.एच.व्ही. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नाट दरम्यान पुलाचे काम झाले असून, उड्डाणपुलाच्या कडेला साईड पट्टयांचे काम अद्यापि करण्यात आलेले नाही. साईड पट्टयांवर मातीचे ढिगारे हटवून ब्लॉक लावणे अपेक्षित होते. मात्र मातीचे ढिगारे साईड पट्टयांच्या कडेला टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ते मातीचे ढिगारे खचून पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहाने पुलावरील माती मोठ्या प्रमाणात खाली येत आहे. यामुळे उड्डाणपुलावर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
उड्डाणपुलावरील साईड पट्टयांवर ब्लॉक लावण्याच्या कामाची चौकशी व्हावी, या कामांमध्ये संबंधित कंपनीचे कर्मचारी व कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांचे हितसंबंध आहे का? याची देखील चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मौजे अरणगाव (ता. नगर) येथील बाह्यवळण रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नाट मळा दरम्यान असलेला उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपुलाच्या कडेला साईड पट्टयांवर ब्लॉक बसविण्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने याची दखल घेऊन पुलाच्या साईड पट्टयांचे काम मार्गी लावावे. -मेहेर कांबळे (जिल्हा संघटक, रिपब्लिकन युवा सेना)