अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा
अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे गटेवाडी, सुलतानपूर व ढवळपुरी येथील तसेच नगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील अवैध गौण खनिन उत्खनन प्रकरणी कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. 1 जुलै पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेळोवेळी तक्रार करुन, पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने व कारवाईची दंड वसुली देखील केली जात नसल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी स्पष्ट केले आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे गटेवाडी येथील गट नंबर 203 फॉरेस्ट हद्दीतून ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार व सरपंच यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून कामासाठी वापर केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा अधिनियम 2017 व 12 जानेवारी 2018 मधील मधील तरतुदीनुसार पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी व भारतीय दंड संहिता कलम 397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे म्हंटले आहे.
सुलतानपूर येथील गट नंबर 323 सामूहिक शेती गट खरेदी करून प्लॉटिंग व्यवसायासाठी अवैध गौण खनिज उत्खनन करून भर टाकल्याने स्पॉट पंचनामा करून दंडात्मक कारवाई होण्याबाबत 30 डिसेंबर 2024 पासून तक्रारीचा पाठपुरावा करून पारनेर तहसील कार्यालयाने कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ढवळपुरी येथील गट नंबर 311 व 184 मधील अवैध गौण खनिन उत्खनन करून भर टाकल्याने 28 एप्रिल 2025 रोजी दंडात्मक नोटीस बजावण्यात आलेली आहे. मात्र या दंडाच्या रकमेचा भरणा अद्यापि करण्यात आलेला नाही. पारनेर तहसीलदार पारनेर यांनी दंडात्मक नोटिसची रक्कम वसूल करण्यास दिरंगाई केली आहे. तसेच अहिल्यानगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील गट नंबर 217/1 मध्ये अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून भर टाकल्या बाबत वारंवार तक्रारी अर्ज करूनही तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई करत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.