कोयत्याने हल्ला केलेला असताना पोलीसांनी योग्य कलम लावली नसल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात जबर मारहाण करुन कोयत्याने हल्ला केलेला असताना नगर तालुका पोलीस स्टेशनला साध्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपींवर योग्य ती कलमे लावून कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी बाबासाहेब कदम यांनी केली आहे.
5 नोव्हेंबर रोजी शेतीच्या वादातून बाबासाहेब कदम व त्यांची आई द्रोपदाबाई यांना जबर मारहाण करण्यात आली. संदीप कदम याने पाईपने मारहाण केली, चंद्रकांत कदम यांनी दगडाने तर ज्ञानेश्वर कदम यांनी त्यांच्या शेतातील ऊस तोडण्याच्या कोयत्याचा वापर करून दोन्ही बोटे निकामी केले. आईने मध्यस्ती करुन भांडणे सोडविण्यासाठी आली असता, तिला देखील आशा कदम हिने मारहाण केल्याचे फिर्यादीने निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी 6 नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनला सदर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फिर्याद देताना वस्तुस्थिती नमूद केलेली नाही. आरोपी विरुद्ध साधी कलम लावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आरोपी वारंवार शिवीगाळ व वाद घालून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे म्हंटले आहे. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी बाबासाहेब कदम यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.