अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पंचनामा करून वाळूतस्करांवर दंडात्मक कारवाई व्हावी
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे पोखरी (पवळदरा) भागात शासकीय व खाजगी जमिनीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन झाले असताना सदर जागेचा पंचनामा करून वाळूतस्करांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करावे व मोक्कातंर्गत कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
पारनेर तालुक्यातील मौजे पोखरी (पवळदरा)येथील तलाठी व मंडळाधिकारी यांच्या संगणमाताने गट नंबर 432 मध्ये सरकारी व खाजगी जमिनीतून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून मोठ्या स्वरूपात साठा करण्यात आला आहे. अनेक दिवसापासून हे उत्खनन सुरू असून, त्याचा त्रास पोखरी भागातील अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
अवैध वाळू उपसाच्या वाहतुकीमुळे या भागातील अनेक पक्के डांबरी रस्ते खराब झाले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या गाड्यांनी अनेकांना उडवले असताना देखील वाळूमाफीयांच्या दहशतीमुळे पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद केली जात नाही. मोठ्या प्रमाणात हप्ते वसुलीकरुन हा व्यवसाय पारनेर तालुक्यात खुलेआम सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील मुळा, कावू, कापटी नदीत मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू असून, त्याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात यावे, संबंधित ठिकाणी उत्खननाचे स्पॉट पंचनामे करून त्याचे मोजमापद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात यावी, संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून संघटित गुन्हेगारी विरुद्ध मोक्कातंर्गत अधिनियमांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संबंधीत नदी पात्रता समिती व व संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.