गावाला पाइपलाइन देण्याचा दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक
ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला -प्रा. दिपक जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) गावात बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना एमआयाडीसीने दोन इंची पाइपलाइन कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द अद्याप पर्यन्त पाळला गेला नसल्याने व गावाची तहान भागविण्यासाठी तातडीने पाइपलाइनद्वारे कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ एमआयडीसीच्या बूस्टर जल उदंचन केंद्रास ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच नंदा भगत व उपसरपंच प्रा. दिपक जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र एमआयडीसीचे उप अभियंता यांना पाठविण्यात आले आहे.
देहरे येथे एमआयडीसीने बूस्टर जल उदंचन केंद्र उभारलेले आहे. हे केंद्र गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जागेत उभारताना ग्रामपंचायतने एमआयडीसीला ना हरकत प्रमाणपत्र देवून गावासाठी पाइपलाइन कनेक्शन देण्याची बोलणी केली होती. यावर एमआयडीसीने त्यावेळी गावासाठी दोन इंची पाइपलाइन देण्याचा शब्द दिला होता. एमआयडीसीला देण्यात आलेल्या जागेवर ग्रामपंचायतीला गावाच्या विकासाच्या अनुषंगाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालय बांधकाम करावयाचे होते. तरी देखील तत्कालीन ग्रामपंचायतीने त्या जागेला नाहरकत दिली. दिलेले आश्वासनाची पूर्तता करुन एमआयडीसीने गावासाठी पाइपलाइन कनेक्शन देण्याची नैतिक जबाबदारी होती. मात्र ग्रामस्थांना पाइपलाइनचे कनेक्शन देण्यात आलेले नसल्याने मार्च 2024 मध्ये उपसरपंच प्रा. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते.
गावात पाण्याचे मोठे संकट असून, गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीने शब्द दिलेल्या पाइपलाइनच्या कनेक्शनची गरज असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करून देखील कनेक्शन देण्याची मागणी पूर्ण केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने थेट एमआयडीसीच्या देहरे येथील बूस्टर जल उदंचन केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एमआयडीसीने बूस्टर जल उदंचन केंद्र उभारताना देहरे गावासाठी दिलेला दोन इंची पाइपलाइनद्वारे कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द पाळावा. गावाला पाण्याची गरज असून, एमआयडीसीने आडमुठेपणाची भूमिका सोडावी. अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलन, उपोषण करुन थकले असून, ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला आहे. ग्रामस्थ आता थेट बूस्टर जल उदंचन केंद्राला टाळे ठोकणार. -प्रा. दिपक जाधव (उपसरपंच, देहरे)