महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
सलग दोन दिवस-रात्र सेवा देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतरांचा विचार व्हावा -बाबासाहेब बोडखे
नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीसाठी सेवा अधिग्रहित केलेले शिक्षक, शिक्षकेतर दिवस-रात्र कर्तव्य बजावून थकलेले असताना लगेच दुसऱ्या दिवशी शाळेवर हजर होणे अशक्य आहे. निवडणुकीत कर्तव्यावर असलेल्या शिक्षक, शिक्षकेतरांना दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.21 नोव्हेंबरला) सुट्टी घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील व जि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, सचिव शिवाजी घाडगे, प्रा. अमोल क्षीरसागर, गणेश शिंदे, रमेश बाबंळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सेवा अधिग्रहित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कामाकरिता सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.19 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8 वाजता निवडणूक साहित्य स्विकारुन मतदान केंद्रावर गेलेले आहेत.

निवडणुकीचे साहित्य प्राप्त झाल्यानंतर मतदान केंद्रावर जाणे, साहित्यांची योग्य मांडणी करणे व मतदान प्रक्रियेची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. बुधवारी (दि.20 नोव्हेंबर) प्रत्यक्ष पहाटे पासून निवडणूक प्रक्रिया सुरू करून प्रत्यक्ष मतदान सकाळी 7 वाजता सुरू करणे व संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अखंडपणे मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्याचे कर्तव्य ते पार पाडत असतात. त्यानंतर आदेशानुसार कार्यपूर्तता करून संपूर्ण साहित्य संकलन केंद्रावर जमा करणे इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण कामे शिक्षक कर्मचाऱ्यांना करावी लागतात. सलग दोन दिवस त्यांनी दिवस-रात्र सेवा द्यावी लागते. या कामानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शाळेवर हजर होणे शक्य होत नाही. यासाठी प्रशासनाने निवडणुकीसाठी सेवा अधिग्रहित केलेले शिक्षक, शिक्षकेतरांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
निवडणुकीच्या कर्तव्यावर सलग दोन दिवस-रात्र सेवा देणारे शिक्षक, शिक्षकेतर मानसिक व शारीरिकपणे पूर्णत: थकून जातात. त्यांना लगेच निवडणुकीचे काम संपवून दुसऱ्या दिवशी शाळेत हजर होण्यास लावणे हे अत्यंत गैरसोयीचा व यातना देणारा प्रकार आहे. प्रामाणिकपणे निवडणुकीत सेवा देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतरांना मतदान साहित्य जमा करुन घरी जाण्यास पहाट होते व पुन्हा सकाळी शाळेवर जाणे अशक्य ठरते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कामाचा विचार करुन त्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी देणे गरजेचे आहे. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)