• Thu. Feb 12th, 2026

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने “दास नवमी उत्सव सोहळा “

ByMirror

Feb 11, 2026

श्री अजेय बुवा रामदासी यांना मानाचा “ समर्थ पुरस्कार “ जाहीर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दास नवमी उत्सवानिमित्त सावेडीतील समर्थ प्रशालेच्या प्रांगणात बुधवार दि 11 फेब्रु. सायं. 5 वाजता निरूपण तथा प्रवचनकार कथाकार श्री अजेय बुवा रामदासी यांचे “दासबोधाचे अंतरंग” या विषयावरील व्याख्यान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


तसेच दासनवमीनिमित्त मंडळाचे आधारस्तंभ स्व.दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी (श्री डी.आर.सर) यांच्या स्मरणार्थ समर्थ विचारांच्या प्रचार व प्रसारार्थ देण्यात येणारा मानाचा “समर्थ पुरस्कार” भागवत कथाचार्य श्री अजेय बुवा रामदासी महाराज यांना जाहीर झाला आहे.दासनवमी उत्सवाची सांगता व विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न होणार आहे.अशी माहिती दासनवमी उत्सव समिती प्रमुख व मंडळाचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.


केमिकल इंजिनिअर म्हणून भारतासह परदेशात काम केल्यानंतर कथाकार श्री अजेय बुवा रामदासी यांनी श्री समर्थ सेवा मंडळ, श्रीक्षेत्र सज्जनगड,श्रीक्षेत्र शिवथरघळ,श्रीधर स्वामी मठ आदींपासून अध्यात्म कार्य सुरू करून श्रीराम कथा, श्री हनुमान कथा ,श्री सुंदर कांड, श्रीकृष्ण कथा, महाभारत कथा, व्यंकटेश कथा, श्री समर्थ रामदास स्वामी चरित्र,विविध धार्मिक ग्रंथ इत्यादींचे मराठी , हिंदी,इंग्रजी व संस्कृत या भाषांमध्ये अध्यात्म जागरणाचे काम समस्त देशभर ते अविरत करीत आहेत.


सुमारे 57 वर्षांपासून मंडळाच्या वतीने दासनवमीनिमित्त श्री रामदास स्वामी यांच्या विचाराचे प्रचार-प्रसाराचे काम अविरत चालू आहे.त्याचबरोबर शालेय स्तरावर पाठांतर, हस्ताक्षर, वक्तृत्व, निबंध ,चित्रकला आदी विविध स्पर्धांमध्ये शहरातील हजारो विद्यार्थी व अनेक शाळा यात सहभागी होत असतात तसेच खुल्या गटात वक्तृत्व व निबंध स्पर्धा ह्या समर्थ अभ्यासकांना समर्थ विचार प्रकट करण्यासाठी संस्था एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. श्री समर्थांच्या साहित्यावर आधारित समर्थ विचार अभ्यासकांची दर्जेदार व्याख्याने देखील दासनवमीच्या निमित्ताने प्रतिवर्षी आयोजित केली जातात.


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष भा.ल.जोशी,उपाध्यक्ष दीपक ओहोळ,चेअरमन विकास सोनटक्के,सचिव सुरेश क्षीरसागर,सचिव प्रभाकर ओहोळ,खजिनदार संजय कुलकर्णी,कार्यकारिणी सदस्य सर्वश्री ॲड किशोर देशपांडे, सुनील जोशी,स्वप्निल कुलकर्णी, ॲड वेद देशपांडे ,सचिन क्षीरसागर,संध्या कुलकर्णी,स्वप्निल सोनटक्के आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.


प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर व मुख्याध्यापक अजय महाजन,पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. तरी या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त समर्थ भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *