सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
मागासवर्गीय कुटुंबीयांना केले बेघर; स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाला पाठिंबा
नगर (प्रतिनिधी)- कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबीयांच्या घराचा ताबा घेऊन त्यांना बेघर करणाऱ्या सावेडी येथील खासगी फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणाला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात साहेबराव तेलोरे, शिवाजी भोसले, सुशांत म्हस्के, तक्रारदार विजय लोंढे, विवेक भिंगारदिवे, विजय भांबळ, संजय कांबळे, विजय शिरसाठ, विनोद साळवे, प्रतीक बारसे, अंबादास जाधव, अनिल साळवे, गौतम कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
विजय लोंढे यांनी सन 2017 मध्ये सावेडी येथील एका फायनान्स कडून 14 लाख 47 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. सदर फ्लॅट हा अपूर्ण असताना त्या फायनान्स कंपनीने कर्जाची पूर्ण रक्कम बिल्डर यांच्या ताब्यात दिली. यामुळे संपूर्ण कर्जाचा हप्ता सुरु झाला. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी अर्ज करुन देखील जाणीवपूर्वक योजनेचा लाभ मिळवून दिला नाही. ज्या बँकेत पगार जमा होते, त्या बँकेतून हप्ता कट करण्यात यावा! असे वेळोवेळी सूचना करुनही जाणीवपूर्वक जुन्या खात्यामधूनच हप्ता घेण्यासाठी चेक टाकत राहिले. ऑनलाइन स्वरूपात सुद्धा हप्ता देण्याची तयारी दर्शवून देखील फायनान्स कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांचे खाते एनपीए मध्ये गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरोना काळात सर्व काही बंद असताना फायनान्स कंपनीने कोणतीही सवलत न देता, जास्तीचा हप्ता व व्याज वाढविले. घराची बेकायदेशीरपणे कागदपत्रे गोळा करून सदरचा सातबारा उताऱ्यावर घर मॉरगेज नसताना फायनान्स कंपनीने घर ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये 23 सप्टेंबर 2024 रोजी सदर फायनान्स कंपनीने पोलीस स्टेशन येथे थकबाकी पोटी कर्जाची रक्कम 6 लाख 12 हजार व व्याजापोटी 7 लाख 36 हजार रुपये थकीत राहिलेले असल्याचे लिहून दिले.
लोंढे यांनी उर्वरित रक्कम भरण्याची व हप्त्यांमध्ये रूपांतरित करुन किंवा पूर्ण सेटलमेंट करण्याची तयारी दर्शविली. मात्र फायनान्स कंपनीने जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार दिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, बेघर केलेल्या कुटुंबाला घर मिळवून देण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.