12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाला पाठिंबा
सौंदाळा ग्रामपंचायतीचा ठराव सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा निर्णय -कॉ.ॲड. सुभाष लांडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालयात पार पडली. ही बैठक कॉम्रेड प्रताप सहाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सामाजिक समता, कामगारशेतकरी प्रश्न, आगामी आंदोलन तसेच निवडणूक तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
सौंदाळा (ता. नेवासा) ग्रामपंचायतीने जातमुक्त गाव ठराव संमत केल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरपंच शरद आरगडे व ग्रामसभेचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सामाजिक न्याय व समतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सहसचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, बापूराव राशिनकर, सुरेश पानसरे, दशरथ हासे, दत्तात्रेय आरे, ज्ञानोबा गायकवाड, सुनील दुधाडे, सुलाबाई आदमाने, सुनिता सहाणे, राजेंद्र व्यवहारे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत 12 फेब्रुवारी रोजी देशातील कामगार संघटना संयुक्त कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. पक्षाच्या सर्व जनसंघटना या संपात व आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
याशिवाय येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गट व गण निश्चित करून आतापासूनच निवडणूक तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात आले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाखांमधून सभासद नोंदणी मोहीम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, सौंदाळा ग्रामपंचायतीने संविधानाला अभिप्रेत असलेले जातमुक्त गावाचा ठराव हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ऐतिहासिक टप्पा आहे. अशा निर्णयांमुळे गावागावात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय मजबूत होईल. आज देशातील कामगार, शेतकरी, कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक धोरणे लादली जात आहेत. महागाई, बेरोजगारी, खासगीकरण आणि शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात 12 फेब्रुवारीचा देशव्यापी संप अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या लोकशाहीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत सभासद नोंदणी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून पक्ष अधिक बळकट करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, आयटक संलग्न सर्व कामगार संघटना 12 फेब्रुवारीचा देशव्यापी संपात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे या संपाद्वारे सरकारला कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉ. संतोष खोडदे यांनी प्रास्ताविक केले.
