तथागत बुध्दिस्ट सोसायटीने शहरात केला सन्मान
नगर (प्रतिनिधी)- बौध्द धम्म चळवळीतील धम्ममित्र दिपक अमृत यांना बौध्द धम्माच्या कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने गौरव करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या गौरव सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी अमृत यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे भन्ते सचितबोधी, धम्म्मपाल, धम्मशिरी, शिवाजी भोसले, रमेश पगारे, वधु-वर सुचक प्रमुख अशोक बागुल, बौध्दाचार्य विजितकुमार ठोंबे, बौध्दाचार्य दिपक पाटोळे, पप्पु देठे, जाधव, दिव्याताई, सिंध्दात काळे, सुमेध डंबाळे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
संजय कांबळे म्हणाले की, जिल्ह्यातील बौध्द धम्म चळवळीत दिपक अमृत सातत्याने योगदान देत आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन कर्नाटक येथील युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसाच्या वतीने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे. त्यांचा झालेला हा सन्मान जिल्ह्यातील बौध्द धम्म चळवळीच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. सरकारी नोकरीत कार्यरत राहून ते तथागत बुध्दिस्ट सोसायटीला जोडले गेले असून, उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत आहे. संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या गरीब कुटुंबातील दांपत्याचा विवाह लावणे, मोफत आरोग्य शिबिर, बौद्ध वधू वर सूचक मंडळ, बौद्धाचार्य तयार होण्यासाठी श्रामनेर शिबिर राबविणे या कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांचा झालेला सन्मान हा सर्वांसाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना दिपक अमृत म्हणाले की, धम्म चळवळीशी जोडलो गेल्याने समाजात सन्मान मिळाला. बौध्द धम्माच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. हा सन्मान एकट्याचा नसून, चळवळीतील सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.