डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व जय युवा अकॅडमीचा उपक्रम
बाबासाहेबांनी संविधानरूपी अमूल्य देणगी सर्व समाजासाठी दिली -ज्ञानेश्वर खुरांगे
नगर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानरुपी अमूल्य देणगी सर्व समाजासाठी दिली. समाजामध्ये समता, न्याय, बंधुता, प्रत्येकाचे हक्क, कर्तव्य, समान संधी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अन्यायाविरुद्ध प्रहार करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र त्यांनी सर्वांना दिला असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन आयोजित जय भीम पदयात्रेच्या समारोप मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झाले. यावेळी खुरांगे बोलत होते. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, रयतचे पोपट बनकर, समाज परिवर्तनचे डॉ. भास्कर रणनवरे, जय युवाचे दिनेश शिंदे, माहेर संस्थेच्या रजनीताई ताठे, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे संतोष लयचेट्टी, श्रीनिवास नागुल, मियाभाई सय्यद, रामेश्वर राऊत आदी उपस्थित होते.
युवा मंडळाच्या माध्यमातून माळीवाडा परिसरातून जय भीम पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ॲड. महेश शिंदे यांनी उपस्थितांकडून संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करून घेतले व संविधानाचे महत्त्व विशद केले.
समाज परिवर्तनाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर, तर उडान फाउंडेशनच्या माध्यमातून प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, नाट्यरूपी प्रबोधन रतडगाव येथे झाले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर यांचे मार्गदर्शन लाभले.