मुलांना आवडीच्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन द्यावे -रऊफ शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- संगणक अभियांत्रिकी व नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुकुंदनगर येथील युवकांचा सन्मान करण्यात आला. पालघर येथील महाविद्यालयात डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअर परीक्षेत अली खान प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर नुकतेच झालेल्या नीट परीक्षेत दानिश शेख याने चांगले गुण मिळवून एमबीबीएससाठी नंबर लागल्याबद्दल दोन्ही युवकांचा पोलीस मित्र व रऊफ बिल्डर फ्रेंड सर्कलच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी मेजर रऊफ शेख, हाजी बिलाल अहमद, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मिर्झा नवेद, सेवानिवृत्त पीएसआय जमादार शेख, याकूब पटेल, फारूक शेख, कासीम शेख, इस्माईल पठाण, गोटू जहागीरदार, अन्सार शेख, हाजी अब्दुल जलील, फकीर मोहम्मद शेख, बशीर पठाण, अलीम शेख आदी उपस्थित होते.
रऊफ शेख म्हणाले की, मुलांना आवड असलेल्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन द्यावे. करिअर घडविण्याच्या वयात त्यांच्यावर घराची जबाबदारी न लादता त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे. मुस्लिम समाजातील युवक शिकल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षणात ड्रॉप आऊटचे प्रमाण मोठे असून, याबाबत जागृती होण्याची गरज आहे. युवकांनी करिअर घडविण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षेत उतरण्याचे त्यांनी आवाहन केले.

मिर्झा नवेद म्हणाले की, शिक्षणाने कर्तृत्व सिध्द करुन प्रगती साधली जाते. शिक्षणाने उद्याचे भवितव्य घडणार आहे. शिक्षण फक्त नोकरीसाठी नव्हे, तर एक सक्षम व सशक्त नागरिक घडविण्यासाठी आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळवता येते. ध्येय प्राप्तीसाठी जिद्दीने केलेल्या प्रयत्नांना बिकट परिस्थिती आडवी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना खान व शेख या युवकांनी भविष्यात चांगल्या पध्दतीने यश प्राप्त करण्याची प्रेरणा मिळत राहणार असल्याची भावना व्यक्त केली. बिलाल अहमद यांनी आभार मानले.
