समाज कल्याण उपायुक्तांची बदलीसाठी रिपाईआग्रही, अन्यथा दोषी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात समाज कल्याण मार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांची गैरसोय व होत असलेल्या पिळवणूकीची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे करण्यात आली. तर याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन समाज कल्याण उपायुक्तांची बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी रिपाईचे नगर तालुकाध्यक्ष पै. अविनाश भोसले, उपाध्यक्ष जयाराम आंग्रे, शहर उपाध्यक्ष प्रतीक नरवडे, मुस्लिम आघाडी अध्यक्ष सिकंदर शेख, नाझीम कुरेशी, अक्षय शिरसाठ, वसीम पटेल, अभिजीत वाघमारे, विशाल पठारे, अमोल आल्हाट आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार, वीट भट्टी मजूर व शेतीवर मोल-मजुरी करणारा आर्थिक व मागासवर्गीय दुर्बल घटक वर्ग आहे. या वर्गातील पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी तालुकाच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात ठेवतात. शासनाने या मुलांचे शिक्षण, राहणे व जेवण या सर्व गोष्टींवर अत्यंत चांगले नियोजन केले आहे. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या गैरकाराभाराने मुलांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुदत संपूनही वस्तीगृहातील वॉर्डनची बदली झालेली नाही, मुलांना निकृष्ट जेवण देण्यात येते, वस्तीगृहाची मंजूर विद्यार्थी संख्या 75 असूनही संपूर्ण वर्षभर ॲडमिशन प्रक्रिया सुरु असते, वस्तीगृहातील मेसचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराच्या टक्केवारीमुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण पुरविले जाते. या सर्व प्रकारामध्ये अधिकारी कर्मचारी संगतमताने अपहार सुरु असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
वस्तीगृहातील मेसच्या बिलासाठी ठेकेदाराची टक्केवारी बंद करुन विद्यार्थ्यांना सकस व चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे, विद्यार्थ्यांचे स्टेशनरीचे भत्ते व इतर अनुदान तातडीने द्यावे, वस्तीगृहात विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा, वाचनालय व संगणक लॅबची सुविधा द्याव्या, विद्यार्थ्यांकडे शाळेत जाण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष द्यावे, स्वाधार योजनेचे पैसे मिळण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवावी, वस्तीगृहाची वेळोवेळी पहाणी करुन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाची चौकशी करुन मागासवर्गीय मुलांची हेळसांड करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व या प्रकरणाला जबाबदार असणारे समाज कल्याण उपायुक्तांची बदली करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करुन अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.
