टाकीची त्वरीत दुरुस्ती करण्याची भाजपच्या सरचिटणीस कोटा यांची मागणी
दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड शिवाजीनगर येथील अस्वच्छ व गळकी पाण्याच्या टाकीची त्वरीत दुरुस्तीसाठी भाजपच्या सरचिटणीस सविता प्रकाश कोटा यांनी पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना निवेदन दिले. तर या टाकीमुळे दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, गळक्या टाकीमुळे पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्या प्रकरणी पालकमंत्री विखे यांचे लक्ष वेधले.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विखे पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबारमध्ये शिवाजीनगर येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मांडण्यात आला. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव गीता गिल्डा, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र (भैय्या) गंधे, महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जाणवे, सरचिटणीस प्रशांत मुथा, महेश नामदे, सचिन पारखी, सचिव रोहिणी कोडम आदी उपस्थित होते.
शिवाजीनगर भागात अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना वेळेवर पाणी येत नाही. जे पाणी येते ते देखील दुषित असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षापासून या टाकीची स्वच्छता व दुरुस्ती झालेली नाही. याच टाकीतून संपूर्ण नगर-कल्याण रोड परिसराला पाणी पुरवठा होत आहे. या पाण्यात पशु-प्राण्याची विष्टा देखील आढळली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील अस्वच्छ पाण्याच्या टाकीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. महापालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, तातडीने या टाकीची स्वच्छता करुन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कोटा यांनी केली आहे. पालकमंत्री विखे यांनी तात्काळ याप्रकरणी माहिती घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले.