सह्याद्री छावा संघटनेचे विद्युत महावितरणला निवेदन
अनाधिकृत घरकुल जमीनदोस्त करुन शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे कामरगाव येथे विद्युत रोहित्राच्या (डीपी) बाजूला शासकीय जागेत अनाधिकृत घराचे बांधकाम त्वरीत थांबवून बांधण्यात आलेले सदरचे काम जमीनदोस्त करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) उमाकांत सपकाळे यांना निवेदन दिले. यावेळी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, संघटनेचे दत्ता वामन, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, धडक जनरल संघटनेचे श्रीधर शेलार, काकडे आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यातील मौजे कामरगाव येथे शासकीय मालकीच्या जागेत पहिल्यापासून विद्युत रोहित्र आहे. या रोहित्रापासून गावाला विद्युत पुरवठा केला जातो. पण सदरच्या शासकीय जागेत तेथील असणाऱ्या एका व्यक्तीने अनाधिकृत रित्या घरकुल बांधण्याचा प्रकार ग्रामपंचायत सरपंच यांना हाताशी धरून केला आहे. सदर रोहित्राला खेटून नवीन घर बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदरच्या घरकुलाचा पहिला एकच हप्ता रक्कम 15 हजार रुपये मिळालेली असून, सदरचे घरकुल जाणीवपूर्वक काम पूर्ण करून नंतर सदरच्या कामाचे हळूहळू फोटो काढून शासनाचे घरकुलासाठी अनुदान लाटून फसवणूक करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्रीय विद्युत सुरक्षा अधिनियम 2023 अन्वये विद्युत रोहित्राच्या बाजूला 3.7 मीटर परिघांमध्ये कोणतेही घर बांधता येत नाही. या नियमाला डावलून ग्रामपंचायत सरपंच, घरकुलाचे लाभार्थी तसेच गावातील विद्युत विभागाचे कर्मचारी, कनिष्ठ अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केंद्रीय विद्युत सुरक्षा अधिनियमन 2023 च्या नियमा मधील कायद्याचा भंग केला आहे.
गावठाण हद्दीत शासकीय जागेत महावितरण कंपनी यांचे रोहित्र फार पूर्वीपासून आहे. परंतु सरपंच, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे सर्व मिळून रोहित्र अन्यत्र ठिकाणी बसवण्याचा घाट घालत आहे. विनाकारण महावितरण कंपनीला आर्थिक भुर्दंड देऊन शासनाची फसवणूक करत आहेत. घरकुलासाठी जागा अन्य ठिकाणी देणे गरजेची असतानाही जाणूनबुजून घरकुल रोहित्राच्या शेजारी बांधून सरकारी जागा हडप करण्याचे षडयंत्र असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, लाभार्थी आणि विद्युत महावितरणचे वायरमन, कनिष्ठ अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, सदरच्या घरकुलाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 25 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.