निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे चौंभुत येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व चौंभुत ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर ठेकेदाराच्या मनमानी पध्दतीने सुरु असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे व चौकशीपूर्वी कोणतेही बील अदा न करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पारखे, प्रणल भालेराव व योगेश बरकडे यांनी केली आहे.
मौजे चौंभुत (ता. पारनेर) येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सदर काम अंदाज पत्रकानुसार होत नसून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. तर सुरु असलेले काम निकृष्ट असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ठेकेदाराला सदर कामाबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. ठेकेदाराने गावातील मुख्यमंत्री सडक योजनेतील पक्के रस्ते फोडून रस्त्याच्या साईड पट्ट्या उखरुन सदरचे काम सुरु केलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाची कुठलीही परवानगी ठेकेदाराने घेतलेली नसताना परस्पर रस्ता खोदणे व झाडे तोडण्यात आली आहे. अंदाजपत्रकामध्ये पाण्याच्या टाकीची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी टाकीचे बांधकाम सुरू आहे. सदरचे बांधकाम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. अंदाजपत्रकात पाईपलाईन मंजूर असलेल्या ठिकाणी काम न करता दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या कामासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. हे काम निकृष्ट झाल्यास ग्रामस्थांना या कामासाठी पुन्हा निधी मिळणे अवघड असून, होत असलेले काम चांगल्या प्रकारे होण्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. 15 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास चौंभुत गावाच्या ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
