मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड
नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14 व 16 वर्ष वयोगटातील खेळाडूंचे संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत असून, अटीतटीचे सामने होत आहे. तर पहिल्याच दिवसापासून मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल, तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट व द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड सुरु झाली आहे.
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी (दि.26 ऑगस्ट) 17 वर्षा खालील मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलची वेदिका ससे हिने एकामागेएक सलग 3 गोल केले. यामध्ये 0-3 गोलने आठरे पाटील स्कूल संघाने विजय मिळवला.
14 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये अटातटीचा सामना रंगला होता. यामध्ये अर्णव नाकाडे याने 1 गोल करुन 0-1 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलला विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रात 17 वर्षा खालील मुलींमध्ये द आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल संघात अटातटीचा सामना रंगला होता. दोन्ही संघांना शेवटच्या क्षणा पर्यंत एकही गोल करता आला नाही. हा सामना अनिर्णित राहिला.
12 वर्ष वयोगटात (मुले) द आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल संघाचा सामना देखील 0-0 गोलने शेवट पर्यंत अनिर्णित राहिला.
14 वर्ष वयोगटात (मुले) द आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द डॉन बॉस्को स्कूल मध्ये रंगलेल्या सामन्यात द आयकॉन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करुन तब्बल 5 गोल केले. यामध्ये ओम लोखंडे, मयंक बजाज, विराज पिसे यांनी प्रत्येकी 1 तर इशान गरड यांने 2 गोल केले. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. 5-0 गोलने द आयकॉन पब्लिक स्कूलचा संघ विजयी ठरला.
16 वर्ष वयोगटात (मुले) द आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द डॉन बॉस्को झालेल्या रंगतदार सामन्यात युवान शर्मा याने 1 गोल करुन 1-0 ने द आयकॉन पब्लिक स्कूलला विजय मिळवून दिला. स्पर्धेचे पंच म्हणून सलमान शेख, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, प्रकाश कनोजिया, महिमा पठारे, सुर्य नैना, पूजा भिंगारदिवे, जॉय शेळके, अभय साळवे, विल्यम राज हे काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सचे सदस्य परिश्रम घेत आहे.
शहरात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या माध्यमातून दरवर्षी इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. शालेय वयातच उत्कृष्ट खेळाडू घडून मोठे व्हावे, या उद्देशाने मागील 6 वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून शालेय संघ सहभागी होत असून, यावर्षी तब्बल 47 संघांनी सहभाग नोंदवला आहे.