• Sun. Mar 30th, 2025

महाविद्यालयीन युवक-युवतींनी शूरवीरांचे स्मरण करुन केला शहीद दिन साजरा

ByMirror

Mar 26, 2025

नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण करून देण्याची गरज -प्रा. संजय पडोळे

नेहरु युवा केंद्र व उडान फाउंडेशनचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- शूरवीरांचे स्मरण दिवस म्हणून शहीद दिन साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी या दिवसाचे खास स्मरण देशभरात केले जाते. ब्रिटिश राजवटी पासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या अथक संघर्षाची आणि बलिदानाची ही एक मार्मिक आठवण आहे. नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्यांची आठवण करून देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य संजय पडोळे यांनी केले.


नेहरु युवा केंद्र अहिल्यानगर व उडान फाउंडेशनच्या वतीने शहरातील श्रीकांत पेमराज गुगळे कनिष्ठ महाविद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी पडोळे बोलत होते. याप्रसंगी संतोष लयचेट्टी, माहेरच्या अध्यक्षा रजनीताई ताठे, प्राचार्य दत्तात्रय कसबे, प्रा. सुभाष चिंधे, प्रा. संजय शेवाळे, सहशिक्षिका विजया संसारे, कल्पना तुपे, सुवर्णा बारगळ, अश्‍विनी घोडके, पुनम साठे, पल्लवी चोरडिया, सहशिक्षक गणेश पुंड, ज्ञानेश्‍वर बर्डे, किशोर सप्रे, ऋषिकेश माताडे, प्रमोद कानडे, प्रवीण पाटील, विद्या बाबद, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे आदींसह महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्राचार्य दत्तात्रय कसबे म्हणाले की, शहीद दिन हा आपल्या राष्ट्राच्या वृद्धीसाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करतो. राष्ट्रीय एकता आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून शहीद दिन साजरा केला पाहिजे. देशाच्या स्मृतीला बळकटी देणारा हा दिवस महत्त्वाचा आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांनी भव्य निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चा मधील जमाव पांगवण्यासाठी अमानुष लाठी चार्ज करण्यात आला. त्यात लाला लजपतराय जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारण्याचा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी ठरविले व त्या योजनेनुसार ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी. सॅण्डर्सची हत्या केली. या तिघांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण युवा देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचे रक्त पेटून उठले. त्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रखर झाली.


संतोष लयचेट्टी यांनी आजचा युवक मोबाईलच्या जाळ्यात गुरफटत चालला आहे. नैराश्‍य, व्यसनाधिनतेकडे वळत आहे. अशा युवा अवस्थेत काय करता येऊ शकते? याचे आदर्श उदाहरण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे युवक आहे. निश्‍चित देशभक्ती देशासाठी सर्वस्वी त्यागाची तयारी अशा प्रकारे देश प्रेमाचे धडे युवकांनी गिरवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आरती शिंदे यांनी नेहरु युवा केंद्राचे कार्य युवकांसाठीचे विविध उपक्रम, शासकीय योजना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका उमादेवी राऊत यांनी केले. आभार सुभाष चिंधे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, कार्यक्रमाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *