• Wed. Jul 23rd, 2025

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या चिमुकल्या ईशानी खामकरचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार

ByMirror

Nov 7, 2023

विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पुरक राहणीमानाबद्दल जागरुक करणे गरजेचे -सिध्दाराम सालीमठ

अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या तीन वर्षीय ईशानी अमित खामकर हिचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सत्कार करुन कौतुक केले.


नवरात्र उत्सवानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ईशानी अमित खामकर या तीन वर्षीय चिमुकलीने झाडांच्या पानांपासून तयार केलेला गणवेश परिधान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल ईशानी हिचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमित खामकर, प्रायोजक निशांत पानसरे, सुभाष पेंडुरकर, हेमंत ढाकेफळकर, शुभम नांगरे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पुरक राहणीमानाबद्दल जागरुक करणे गरजेचे आहे. प्लास्टीक मुक्ती, वसुंधरेच्या रक्षणाबाबत जनजागृतीपर धडे देवून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बदललेले ऋतूचक्र, तापमानात झालेला बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, पाणी टंचाईचे आणि जगावर घोंघावत असलेले नैसर्गिक संकट दूर करावयाचे असेल तर वृक्ष लागवड व त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे. ही बाब चिमुकल्या ईशानीने ओळखले. तिने अभिनव पद्धतीने पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. याबद्दल ईशानी व तिचे आई-वडील अमित व सुप्रिया खामकर यांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *