अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; सर्व अवैध धंदे शहराच्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारे
अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील विद्यालय व महाविद्यालय परिसरालगत सुरु असलेले अवैध धंदे, गुटखा-मावा विक्री, परमिट रूम, बियर बार त्वरित बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले असून, हे सर्व अवैध धंदे शहराच्या गुन्हेगारीला खतपाणी घालत असून, पोलीस प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्याध्यापक हेरब कुलकर्णी यांनी महाविद्यालय शेजारील गुटखा तस्करी बाबत आवाज उठवल्याने त्यांच्यावर हल्ला झाला. हे प्रकरण त्यांच्या शाळे पुरते मर्यादीत नसून, शहरातील विद्यालय व महाविद्यालयांना अवैध धंदे, गुटखा-मावा विक्री, परमिट रूम, बियर बारने वेढले आहे. शिक्षण हे ज्ञानमंदिर आहे. तिथे भावी पिढीचे भविष्य घडविले जाते. मात्र शाळेचा आडोसा घेऊन अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने वाढली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात काही विद्यालय व महाविद्यालयाच्या काही अंतरावरच परमिट रूम, बियर बारला परवानग्या देण्यात आल्या आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून या परवानग्या दिल्या गेल्या आहेत. तर गुटखा, मावा विक्री तर खुलेआमपणे सुरु आहे. यामुळे भावी पिढीचे भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, जिल्हा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने हा विषय घेऊन विद्यालय व महाविद्यालयाच्या शेजारील अवैध धंदे, गुटखा-मावा विक्री, परमिट रूम, बियर बार त्वरित बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा येत्या पंधरा दिवसात विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक) यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
