रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीचे मनपा आयुक्तांना निवेदन
रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
नगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील लोक वस्तीतून जाणाऱ्या पावन लक्ष्मीमाता मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झालेला असताना रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रकाश वाघमारे, सतीश साळवे, सागर साठे, अश्विन खुडे, पप्पू पाटील, सुरेश वैरागर, दीपक साबळे, बंटी साबळे, पप्पू पाथरे, राजू कांबळे, मयूर चकाले, अक्षय केंजरला, दीपक सरोदे, गणेश ससाणे, अमोल लोखंडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
रामवाडी येथील लोकवस्तीतून पावन लक्ष्मीमाता मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही रहिवाशांनी आणि दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून पूर्वी प्रशस्त असलेला रस्ता खूप अरुंद करून टाकला आहे. पूर्वी या रस्त्यावरुन रिक्षा, मोठमोठ्या वाहन जात होते, मात्र सध्या या रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यास मोठ्या वाहनांना अडचणी येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, भविष्यात इथे दुर्घटना घडल्यास, अग्निशमन गाडी किंवा रुग्णवाहिका या रस्त्यावरून मार्गक्रमण करू शकणार नाहीत. मागील काळात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना याची कल्पना दिलेली असून, संबंधित व्यक्तींनी अतिक्रमण काढलेले नाही आणि पालिकेने यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
येणाऱ्या काळात लक्ष्मी माता मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे, त्यामुळे त्याआधी अतिक्रमण काढून रस्ता प्रशस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. समितीने 3 मे 2024 रोजी तक्रार दिली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तातडीने मनपा प्रशासनाने सात दिवसांत अतिक्रमण काढून टाकावे अन्यथा, आयुक्त यांच्या दालन समोर उपोषण करण्याचा इशारा रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.