नगर तालुक्यातील सामाजिक संस्थांचा उपक्रम
अहिल्यादेवी होळकर या प्रेरणेचा अमूल्य स्रोत -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता. जामखेड) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ परिसरातील साफसफाई, झाडून-झटकून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, जिल्हा परिषद सोसायटीचे सचिव राजेंद्र पवार, भाऊसाहेब ठाणगे, बाळासाहेब बोडखे, बाबुराव जाधव, वैभव बोडखे, नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे आदी सहभागी झाले होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रेरणेचा अमूल्य स्रोत आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून संपूर्ण भारतभर समाजकारण आणि जनकल्याणाची कामे उभी केली. अशा महान मातोश्रींचं जन्मस्थान असलेल्या चोंडी गावात स्वच्छता अभियान राबवून त्यांना आदरांजली वाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.