परिसर स्वच्छ आणि पवित्र असणं हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- पुणेवाडी (ता. पारनेर) येथील कालभैरवनाथ देवस्थान परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मंदिराचा गाभारा, सभामंडप व आसपासचा संपूर्ण परिसर व्यवस्थित स्वच्छ करण्यात आला.
भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, मंदिर परिसर अधिक स्वच्छ, पवित्र आणि भक्तांना सुसज्ज वाटावा, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, नामदेव फलके, सावळेराम येवले, सरला ठाणगे, विनायक दुशमन, छाया ठाणगे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे आदी सहभागी झाले होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या उपक्रमातून केवळ मंदिर नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे. सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने ती अंगीकारली पाहिजे. आपण जिथे राहतो, जिथे श्रद्धेने देवदर्शनासाठी जातो, तो परिसर स्वच्छ आणि पवित्र असणं हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. गावाचा विकास हा केवळ इमारती बांधून होत नाही, तर लोकांच्या मनात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून होत असल्याचे त्यांनी सांगितले.