जेसीबीच्या सहाय्याने हटविले वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे-झुडपे
मागील चार वर्षापासूनचा उपक्रम; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात असलेल्या 4 किलोमीटर पर्यंतच्या जॉगिंग ट्रॅकच्या कडेला पसरलेल्या वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे-झुडपे जेसीबीच्या सहाय्याने लोकवर्गणीतून हटविण्यात आले. सकाळी व संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास येणारे नागरिक व व्यायामासाठी असलेल्या युवकांनी लोकवर्गणीतून हे काम मार्गी लावले. यामुळे भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅकचा श्वास मोकळा झाला आहे.
मागील चार वर्षापासून पावसाळा संपल्यानंतर भुईकोट किल्ल्याच्या जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास येणारे नागरिक व युवक सातत्याने हा उपक्रम राबवित आहे. जिल्हा प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन भुईकोट किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे व या भागात पथदिवे बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅकच्या कडेला मोठ्या प्रमाणात पसरलेले वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे-झुडपे जेसीबीद्वारे नुकतेच हटविण्यात आले. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, गुरुदयालसिंग सुगु, मुस्तफा खान, उस्मान रावसाहेब, समीर शेख, अरविंद ब्राह्मणे, इम्तियाज जहागीरदार, माऊली कुऱ्हे, इलियास जहागीरदार, साहिल शेख, राहुल गोंधळे, ऐहसान शेख, संतोष भैय्या, वैभव सोळंके, योगेश गांधी, दिलीप जगताप, प्रकाश तिपुळे, आर.ए. खामकर, यु.ए. बोरुडे, प्रभाकर दडाळे, के.बी. शेळके, मच्छिंद्र पडोळे, राकेश कुलकर्णी, फरदीन शेख, उद्योजक पोखरणा, गांधी, पटेल आदींचे सहकार्य लाभले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, मागील चार वर्षापासून नागरिक लोकवर्गणीतून भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता करत आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या या जॉगिंग ट्रॅककडे जिल्हा प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे. या मैदानावर सराव करुन अनेक पोलीस, लष्करातील जवान व अधिकारी वर्ग घडले आहे. ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्ग देखील व्यायामासाठी मोठ्या संख्येने येत असून, या जॉगिंग ट्रॅकवर सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.