शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हायटेक शिक्षण पध्दत राबवून त्यांचे भवितव्य घडविले जाणार -राजेंद्र शिंदे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी राजेंद्र शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. बाराखोंगळा मळा येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, भारत पाटील फलके, मच्छिंद्र डोंगरे, बळीभाऊ खळदकर, संजय कापसे, गुलाब कापसे, परबती कदम, रघुनाथ डोंगरे, बाबासाहेब डोंगरे, संजय डोंगरे, संतोष फलके, सतीश उधार, देविदास जाधव, भाऊसाहेब कर्डिले आदींसह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पवार म्हणाले की, निमगाव वाघाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य राजेंद्र शिंदे करत आहे. गावाच्या सर्वांगीन विकासाच्या ध्येयाने प्रेरित होवून त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी निस्वार्थपणे गावाच्या विकासासाठी राजेंद्र शिंदे आपले योगदान देत आहे. विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम त्यांनी स्वखर्चाने केले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्याचे काम केले. तर वाडी-वस्तीवर पथदिवे बसवून गाव प्रकाशमान त्यांनी केले. शैक्षणिक संस्थेद्वारे त्यांच्या हातून गावाचे उज्वल भवितव्य घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र शिंदे म्हणाले की, आदर्श गाव म्हणून निमगाव वाघाला पुढे आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु आहे. गावाचा भौतिक विकास साधत असताना, सर्वांगीन विकास शिक्षणाद्वारे पूर्ण केला जाणार आहे. गावाच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हायटेक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
