नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने उदगीर (जि. लातूर) येथे झालेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शहरातील कुस्तीपटू पै. आकाश अशोक घोडके याने कास्य पदक पटकाविले.
घोडके याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदक मिळवल्याबद्दल नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. वारुळाचा मारुती मंदिर परिसर येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, पै. काका शेळके, पै. मिलिंद जपे, पै. अशोक घोडके, नामदेव साबळे, शिवाजी कदम आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, लोपपावत चाललेला कुस्ती खेळ टिकवण्याचे काम युवा मल्ल करत आहे. शहरासह जिल्ह्यातून अनेक युवा खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पैलवान घोडके याने शहराचे नाव कुस्ती खेळात उंचावले असून, शहरातील अनेक कुस्तीपटूंनी राज्यात आपला दबदबा निर्माण केल्याचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळू भापकर म्हणाले की, कुस्ती खेळात यशासाठी सातत्य व कष्ट करण्याची तयारी महत्त्वाची असते. सरावाने मल्ल तयार होत असतो. शहरातून महाराष्ट्र केसरी घडविण्याचे स्वप्न साकारले जाण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहे. शहराला कुस्ती खेळाचा मोठा वारसा असून, सर्व कुस्तीप्रेमीचे मल्ल घडविण्यास योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पै. आकाश घोडके याने 86 किलो वजन गटात मॅटवर उत्तमपणे कुस्ती करुन कास्य पदकाची कमाई केली. पैलवान घोडके हा नालेगाव येथील नाना पाटील वस्ताद तालीम मधील मल्ल असून, तो सध्या पारनेरला छत्रपती कुस्ती संकुल मध्ये वस्ताद पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.