• Tue. Jul 1st, 2025

शहरातील डॉक्टर, केमिस्ट बांधव, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा अवयवदानसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प

ByMirror

Mar 29, 2025

जिंदगी मिलेंगी फिरसे दोबारा शॉर्ट फिल्म अवयवदान जागृतीला देणार नवा प्रकाश -डॉ. पुरुषोत्तम पवार

नगर (प्रतिनिधी)- द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन अहिल्यानगर शाखा व फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया (एफएमआरआय) यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान अवयदान व देहदान या चळवळीला गती देण्यासाठी जनजागृतीवर जिंदगी मिलेगी फिर से दोबारा या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. शहरातील डॉक्टर, केमिस्ट बांधव, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या शॉर्ट फिल्मचा आनंद घेऊन टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर गरजूंना नवजीवन देणाऱ्या अवयवदान चळवळीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.


दीपक पापडेजा कृत-लघुपट प्रीमियर नगरकरांसाठी कल्याण रोड येथील आयएमए हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे (पुणे), डॉ. कामाक्षी भाटे (रोटो विभाग, के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून आणि विझलेला दिवा पुन्हा नव्याने पेटवून करण्यात आले.


या शॉर्ट फिल्मच लेखन दिग्दर्शक दिपक पापडेजा, छायाचित्रण व संकलन समीर तांबोळी, पार्श्‍वगीत दत्ता पवार व दीपक पापडेजा, पार्श्‍व संगीत बाळकृष्ण जगताप, संगीत संयोजक यश पवार यांनी केले आहे. यामध्ये कलाकार म्हणून डॉ.अंकुश सुद्रिक, गौरी सुद्रिक, प्रकाश मुनोत, कांचन पापडेजा, दिपक पापडेजा, संतोष शिंदे, सोनाली मुनोत, पुरुषोत्तम उपाध्ये, सतीश अहिरे, सुनील शिंदे, क्षितिज पापडेजा, दादासाहेब मडके, सत्यम शिंदे, कृषी देसले, हर्षल नागापुरे आदींनी उत्तम भूमिका पार पाडल्या.


नगर शाखेचे समन्वयक दिपक पापडेजा यांनी अहिल्यानगर फेडरेशनचे कार्य सांगत प्रास्ताविक केले. जिल्हाशासकिय रुग्णालयाचे जिल्हा नेत्रदान समुपदेशन सतिष आहिरे यांप्रसंगी बोलतांना म्हणाले की, मरणोत्तर नेत्रदानाने दोन अंधांच्या जीवनाची चैतन्यमय पहाट होते, जिवंतपणी रक्तदान, जाता जाता अवयवदान व मरणोत्तर नेत्रदान-देहदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.


नोबेल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बापूसाहेब कांडेकर (कार्डिओलॉजिस्ट) यांनी अवयव दान विषयक या शॉर्ट फिल्मला शुभेच्छा देत अवयवादानाची चळवळ नगर जिल्ह्यात उत्तमपणे राबविणाऱ्या फेडरेशनच्या नगर शाखेचे कौतुक केले.
के.ई.एम. हॉस्पिटल मुंबई येथील रोटो विभागाच्या डॉ. कामाक्षी भाटे यांनी यांनी अवयवदान चळवळ काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट करुन, या चळवळीसाठी हॉस्पिटल व समन्वयक टीमच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले. फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे (पुणे) यांनी फेडरेशने बनवलेल्या क्यूआर कोड, स्कॅन कार्ड, माहिती पुस्तिका याबाबत सर्वांशी संवाद साधला. अवयवदानासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे असे कळकळीचे आवाहन केले.


फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी हसता-हसता डोळ्यांच्या पापण्या पाणवणाऱ्या सुनिता तार्इंचा संघर्षमय जीवन प्रवास उलगडला. जीवंतपणी कोणाला अवयावांची गरज पडू नये, आणि मृत्युनंतर कोणी शरीरातील मौल्यवान अवयवांची राख करू नये. जिंदगी मिलेंगी फिरसे दोबारा शॉर्ट फिल्म अवयवदान जागृतीला नवा प्रकाश देणारी ठरणार असल्याचे सांगून, त्यांनी गरजवांतासाठी अवयवदान करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमास नगर आयएमए संघटना प्रमुख डॉ. शर्मा, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संजय गुंदेचा, एमएसएमआरए चे राज्य सचिव सिध्देश्‍वर कांबळे, मोबाईल रिटेलेर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजितदादा जगताप, सांगळे हॉस्पिटलचचे डॉ. सांगळे, डॉ.संजकुमार लढ्ढा, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मुस्कान तलरेजा, डॉ.कलमेश तलरेजा, दासरी, भूषण देशमुख, डॉ.अशोक गवित्रे, राज गिरी, डॉ.मॉरिस पारधे, राजु गोर्डे, सुनिता थोरात, बाळकृष्ण जगताप, दत्ता पवार, भारत बागरेचा, रामचंद मेंघानी, एस.एल. देडगावकर, अतुल डागा, दिनेश भाटिया, दिपक पापडेजा आदी उपस्थित होते.


या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय, पंजाबी युथ ऑर्गनायझेशन, घर घर लंगर सेवा, अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसयटी, सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन, सराफ, तिरंगा फाउंडेशन, साई फिल्म आर्ट्स असोसिएट, अनाम प्रेम, स्नेहालय आदी संस्थांनी सहयोग दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी सुद्रिक व कांचन पापडेजा यांनी केले. आभार सोनाली मुनोत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *