अनियमितता, भ्रष्टाचार, दिरंगाई व टोळवाटोळवी होत असल्याचा आरोप; आपचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
जनतेची कामे नियमानुसार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वचक निर्माण करावा -प्रा. अशोक डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व सेवा क्षेत्रातील खाजगी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. तर सदरील कामात अनियमितता, भ्रष्टाचार, दिरंगाई व टोळवाटोळवी होत असल्याचा आरोप करुन यासंदर्भात उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आपचे जिल्हा सचिव प्रा. अशोक डोंगरे, शहराध्यक्ष श्रीराम खाकाळ, शहर महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, दिलीप घुले, सचिन एकाडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व सेवा क्षेत्रातील खाजगी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात. जनतेच्या हिताच्या अनुषंगाने सर्व कार्यालयात कामे नियमाने होत नाही. या कार्यालयाच्या कामांमध्ये सुधारणा होण्यासाठी व जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनाने कामे होण्यासंदर्भात सर्वांना सूचना करण्यात याव्या. अनेक कार्यालयात सुरु असलेले असंवैधानिक कामे तात्काळ बद करुन शासन व प्रशासन यांचा मेल घालून त्यांच्याशी संबंधित असलेले नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
शासकीय, निमशासकीय व सेवा क्षेत्रातील खाजगी कार्यालयात सर्वसामान्यांची कामे सहजासहजी होत नाही. अनेक कामामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार, दिरंगाई व टोळवाटोळवी होत आहे. नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. जनतेची कामे नियमानुसार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर वचक निर्माण करावा. विविध कार्यालयाच्या तक्रारीनुसार कारवाई करावी. अन्यथा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून संबंधित कार्यालयात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. -प्रा. अशोक डोंगरे (जिल्हा सचिव, आम आदमी पार्टी)