पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची लोकजागृतीसाठी चळवळ
नगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी बस स्थानकाच्या जागेतून मतदार अक्कलमारी शून्यावर आणण्यासाठी रविवारी (दि.10 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता नागरिकांचा जाहीर शपथविधी होणार आहे. गेली 50 वर्षे देशात मतदार अक्कलमारीतून सत्तापेंढारी आणि गुन्हेगारांच्या मागच्या दाराने सत्ता मिळवण्याच्या तंत्राला सुरुंग लावण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची चळवळ असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
सध्याच्या महाराष्ट्रातील सार्वजनिक विधानसभा निवडणुकीमध्ये तमाम मतदारांनी ऑपरेशन डिच्चू कावा व डिच्चू फत्तेची अंमलबजावणी करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद प्रयत्नशील आहे. देशाला स्वातंत्र्य दीडशे वर्षाच्या लढ्यानंतर मिळाले, परंतु त्यासाठी लाखो लोकांना हुतात्मे व्हावे लागले, स्वतंत्र्योत्तर भारतात लोकशाही तत्वप्रणाली आणि सन 1952 पासून निवडणुका सुरू झाल्या, परंतु गेल्या 50 वर्षात देशभरात सत्तामारी, टक्केवारी व फ्लेक्स दारोदारी यातून मिळवलेल्या काळ्या पैशाचा वापर मतदार अक्कलमारी करण्यासाठी सर्रास सुरू आहे. अण्णा हजारे यांनी वीस वर्षांपूर्वी जाहीर रीतीने स्पष्ट केले होते, की निवडणुकीमध्ये मी फॉर्म भरला तर डिपॉझिट देखील जप्त होईल, मतदार हे पाचशे रुपये देणाऱ्यांच्या मागे जातात यातून भारतातील लोकशाहीला झालेला कॅन्सर सर्वांनी मान्य केला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी डिच्चू कावा आणि डिच्चू फत्ते तंत्राचा वापर स्वराज्य उभे करण्यासाठी केला. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध सन 1942 मध्ये आझाद मैदानावरून चले जाव! ची घोषणा दिली होती. त्यातून क्रांती झाली. आज नगरसह सर्वच शहरांमध्ये रस्त्यांना खड्डेच खड्डे आहेत, दारिद्य्र वाढत आहे, झोपडपट्ट्या वाढत आहेत आणि आया-बहिणींना अशा झोपडपट्ट्यांमधून नालीच्या कडेला उघड्यावर आंघोळ करावी लागते.
देशात गुन्हेगारी वाढली आहे. भ्रष्टाचार आणि सार्वजनिक जीवन संपुष्टात येत आहे. या सर्व गोष्टींच्या मागे फक्त एकच बाब आहे, ती म्हणजे मतदार अक्कलमारी. मतदार स्वार्थासाठी मतकोंबाड होतात, जाती धर्माच्या नावावर मतदान करतात. परंतु सत्तापेंढारी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून मतदार अक्कलमारी यशस्वी करतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर तरी मतदारांनी आणि नागरिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण देशाला बळी देत आहेत, आर्थिक स्वातंत्र्यापासून तमाम जनतेला वंचित करत आहोत, या बाबी लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मतदार अक्कलमारी विरुद्ध लोकब्रह्मास्त्र संघटनेने ऑपरेशन डिच्चू कावा आणि डिच्चू फत्ते या स्वरुपात मतदारांच्या हाती दिले असल्याचे म्हंटले आहे.
मतदारांनी आपल्या भावी पिढ्यांचा विचार केला पाहिजे. अन्यथा अक्कलमारीमध्ये बळी पडणारे मतदार आणि नागरिकसुद्धा देशद्रोही ठरल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्रात येन केन प्रकारे मतदारांना जाळ्यामध्ये पकडण्यासाठी सर्वच पक्ष आणि सत्तापेंढारी प्रयत्नशील आहेत. परंतु मतदारांनी हा देश महाशक्ती होण्यासाठी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती असणाऱ्या उमेदवारांनाच मतदान केले पाहिजे. अन्यथा देशाची गेली 50 वर्षे वाया गेली तसेच पुढच्या पिढ्या देखील आर्थिक न्यायापासून वंचित राहतील.
त्यामुळे लोकजागृतीच्या उद्देशाने अक्कलमारी शून्यावर आणण्यासाठी नागरिकांचा जाहीर शपथविधी होणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. या चळवळीसाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीर बहादूर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.