• Wed. Nov 5th, 2025

मुकूंदनगरमध्ये उन्हाळ्याच्या प्रारंभीच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

ByMirror

Mar 27, 2024

नागरिकांच्या घरासमोर साचले घाण पाण्याचे डबके; रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने तोडली पाण्याची लाईन

ऐन रमजानच्या महिन्यात नागरिक समस्यांच्या गर्तेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदच्या मागील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांवर भर उन्हात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तर याच परिसरात घरांसमोर ड्रनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण व घरा समोर साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.


सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लिम बहुल भाग असलेल्या या परिसरात सर्वच मुस्लिम बांधव रोजा धरत असतात. रोजाच्या सहेरीसाठी पहाटे चार वाजता उठावे लागते. यानंतर महिलांना दिवसभर रोजामध्ये घरातील काम करावी लागतात, परंतु सदरच्या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. या परिसरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात आणि ते देखील रोजामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.


या परिसरा समोरील शेजारच्या गल्लीमध्ये महानगरपालिकेने सिमेंटचा रस्ता केला आहे. हा रस्ता करताना ठेकेदाराने भूमिगत गटारीचे चेंबर बंद करून टाकले आहे. तसेच, रस्त्याचे हे काम करताना बडी मरियम मशिदच्या मागील गल्लीमधील नागरिकांचे नळजोड तोडून टाकले आहेत. यामुळे येथील घरांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याने येऊन पाहणी केली आणि आजच तुम्हाला पाणी येईल, असे आश्‍वासन दिले. परंतु अद्यापपर्यत नागरिकांना पाणी मिळाले नाही.



मैलामिश्रीत पाणी दारात व दुर्गंधीचा
रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने बडी मरियम मशिदच्या मागील गल्लीमधील ड्रनेजच बंद केले. यामुळे या गल्लीमधील रस्त्यांवर ड्रनेजचे मैलामित्रीत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिसरात डासांचे प्रमाणात वाढले असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *