अपघातांची मालिका; गतिरोधक बसवण्यासाठी सुजय मोहिते यांचे निवेदन
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये तातडीने गतिरोधक बसवा -सुजय मोहिते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकाच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.
केडगावमधील लिंक रोड गेल्या सहा महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने सुरू असून या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. हा रस्ता भूषणनगर, अयोध्यानगर, साईनगर अशा घनदाट लोकवस्ती असलेल्या भागातून जात असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. अनेक चौकांमध्ये भाजी मार्केट आणि नागरिकांची सततची वर्दळ असल्याने या रस्त्यावर सतत अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
केडगाव बायपासवरील टोलनाका टाळण्यासाठी अनेक अवजड वाहने या लिंक रोडकडे वळत आहेत. ही वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण झाले असून वाहतूक धोकादायक पातळीवर पोहोचली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सुजय मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी येथे एका तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. या प्रकारानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरील वेग नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये तातडीने गतिरोधक बसविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंब करण्यास भाग पाडू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
