गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करुन मोक्कातंर्गत कारवाईची मागणी
त्या आरोपींमुळे महिला देखील भितीच्या सावटाखाली
नगर (प्रतिनिधी)- गुंड प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकतेच जुन्या वादातून चेतन रविंद्र निदाणे (वय 26 वर्षे, रा. कोपरगाव) यांच्यावर चॉपर, तलवारीने जीव घेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण व रोहन जय चव्हाण व इतर आरोपीला तात्काळ अटक करुन चव्हाण यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युनसीपल कॉलनी राहणारे समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले. यावेळी परिना चव्हाण, सुनिता खोकर, वैशाली कोरडे, माधवी निदाणे, शीला पटीना, प्रिया निदाणे, शितल सारसर, कोमल वाणे, नयना वाणे, नीतू बेग, रूपा बागडी, ऐश्वर्या सोहत्रे, मोहिनी जेधे, निर्मला अठवाल, अनिता चव्हाण, शितल सारसर, नयना चावरे, लक्ष्मण सारसर, अनिल वाणे, किरण जरे, गणेश भुजबळ, प्रशांत दळवी, अमोल गोरे, आदर्श साळुंके, गणेश पवार, आयान शेख, योगेश वाघमारे, हर्षल सारसर, किरण रोकडे, स्वप्निल वारे, अंबादास बडे, मुन्ना शेख, तुषार बडे, सागर चौरे, हर्ष शेलार, सुनील नेटके, सार्थक पवार, अभिषेक साखरे, रोनित चव्हाण, सुजल बेग, मयूर गोयर, प्रशांत मिसाळ, सचिन काते, संजय घोडके, अभिजीत गोयर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील टांगे गल्ली येथे 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता गंभीर मारहाणीचा प्रकार घडला आहे. फिर्यादी चेतन रविंद्र निदाणे (वय 26 वर्षे, रा. कोपरगाव) यांच्यावर तीन आरोपींनी जुने वाद असल्याने प्राणघातक हल्ला केला. फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव येथे आले होते. त्यावेळी आरोपी जितू सुरेश चव्हाण (वय 45 वर्षे), रोहन जय चव्हाण (वय 25 वर्षे) आणि दाद्या उर्फ सुनिल जाधव (वय 27 वर्षे) यांनी चेतन निदाणे यांच्यावर चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केला. फिर्यादीने प्रतिकार केल्याने मानेवर होणारा वार त्यांच्या हाताला लागला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तलवारीने वार करून पाठीवर जखम केली, तर तिसऱ्या आरोपीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 109, 115(2), 352, 351(2), 3(5) आणि आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यातील सर्व आरोपी अद्यापि फरार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर प्रकरणातील जितू चव्हाण व रोहन चव्हाण हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यापासून फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांना धोका निर्माण झाला आहे. सदर आरोपी म्युनसीपल कॉलनी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर दशहत निर्माण करत आहे. तर पत्रकार, पोलीस व वकील आपल्या जवळचे असल्याचे सांगून सर्वसामान्यांना धमकावत आहे. त्यांच्या विरोधात जाणाऱ्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचे काम आरोपी व त्यांचे नातेवाईक करत आहे. तर आरोपी परिसरातील महिलांकडे देखील नेहमी चुकीच्या नजरेने पाहतात. त्यांच्या भितीपोटी महिला वर्ग देखील त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची हिंमत करत नाही. त्यांच्यामुळे महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जितेंद्र चव्हाण व रोहन चव्हाण बेकायदेशीर सावकारी करत आहे. व्याजाने पैसे देणे व अव्वाच्यासव्वा दराने व्याज वसुल करण्याचे त्यांचे काम सुरु आहे. व्याजापोटी अनेकांच्या घर देखील त्यांनी बळकावले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी संघटित गुन्हेगार असल्याने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
